Home देश महाराष्ट्र मोकाट जनावरांना राजकीय पुढाऱ्यांचा पाठिंबा!-गणेश लांजेकर

मोकाट जनावरांना राजकीय पुढाऱ्यांचा पाठिंबा!-गणेश लांजेकर

44
0
SHARE

जनावरे सोडण्यासाठी कोंडवाडा विभागाच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ

नागपूर :  रस्त्यांवरील मोकाट जनावरांवरही कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. पण, महापालिकेतील काही नगरसेवक व राजकीय पुढाऱ्यांमुळे कोंडवाडा विभाग त्रस्त असून मोकाट जनावरांवर कारवाई केल्यानंतर काही राजकीय पुढारी कोंडवाडा विभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी करून जनावरे सोडण्यासाठी शिवीगाळ करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मोकाट डकुरांमुळे त्रस्त नागरिकांची समस्या लक्षात घेऊन महापालिकेने डुकरे पकडण्याची मोहीम हाती घेतली. त्याकरिता तामिळनाडू येथून एक विशेष पथक बोलावण्यात आले. डुकरे पकडणाऱ्या पथकावर हल्ला होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याचा विचार करून महापालिकेने पोलिसांचा बंदोबस्तही मागवला होता. दरम्यान, जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकदा हल्ला झाला. पण, मोहीम मागे घेण्यात आली नाही. हल्लेखोरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले व मोहीम पुन्हा राबवण्यात आली.

अशीच मोहीम शहरातील मोकाट जनावरांवर राबवण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हजारो जनावरे शहरातील रस्त्यांवर बसलेली असतात. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो. शहरात ४५७ गोठेधारकांनी अशी परवानगी घेतली असून त्यांच्याकडे ३ हजार १९ जनावरे आहेत. ५८९ अनधिकृत गोठेधारक असून त्यांची जनावरे रस्त्यांवरच असतात. त्यामुळे जनावरे पकडून गोठे मालकावर कारवाई होणे आवश्यक आहे. जनावरांवर कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर यादव नावाचे भाजपचे नेते, काँग्रेसचे ग्वालबंशीसारख्या नगरसेवकांकडून जनावरे सोडण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात येते, असे सांगितले जात असून नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करून केवळ काही लोकांसाठी व्यवस्थेवर दबाव टाकणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनाच धडा शिकवण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही अशा पुढाऱ्यांचा दबावाला बळी न पडता मोकाट जनावरांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात महापालिकेचे कोंडवाडा अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद न देता व्यस्त असल्याचा संदेश पाठवला.

अपघातांमध्ये वाढ

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अपघातांमध्ये वाढ झाली आहे. यंदा १ जानेवारी ते ३१ जुलै दरम्यान एकूण ६४२ अपघातांची नोंद करण्यात आली. त्यात १३८ प्राणांतिक अपघात असून त्यात १२२ पुरुष व २३ महिलांचा मृत्यू झाला. उर्वरित गंभीर अपघात आहेत. गेल्यावर्षी या कालावधीमध्ये ६३५ अपघतांची नोंद करण्यात आली होती. त्यात प्राणांतिक अपघात १२२ होते व १३४ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातांमध्ये अनेक अपघात रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या मोकाट जनावरांमुळे झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here